घरफोडी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत छडा; तीन संशयित आरोपी ताब्यात, सव्वा दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

by Team Satara Today | published on : 12 June 2026


सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत चोरीस गेलेले सुमारे 10 लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि. 4 जून 2026 रोजी घरफोडीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/9/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(3) व 331(4) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादीकडून माहिती घेतली. परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली.

या प्रकरणात अर्जुन कुंदन इंगळे (वय 24), रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. सातारा), सागर नागराज गोसावी (वय 30, रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा) आणि राजेश मारुती जाधव (वय 29, ीा. गोसावी वस्ती, सैदापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली.

संशयितांकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोवेकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोवेकर तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेच्या नियुक्ती प्रक्रियेवर सातार्‍यात पुन्हा प्रश्नचिन्ह; रणजितसिंह भोसले यांचीही नाराजी व्यक्त : निष्ठावंतांना सन्मान देण्याची मागणी
पुढील बातमी
तारळी प्रकल्पाच्या देयकासाठी ठेकेदार आक्रमक; 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

संबंधित बातम्या