कराड : शहरातील बसस्थानकाकडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयितांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.
आकाश शंकर रसनकुटे (वय २१, रा. सैदापूर, ता. कराड, मूळ रा. तासगाव, जि. सांगली) असे जखमीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची माहिती अशी, सैदापूर येथील आकाश रसनकुटे हा काल रात्री नऊच्या सुमारास शहरातील साईबाबा मंदिराजवळील टायर दुकानासमोर उभा होता.
त्यादरम्यान त्याचा मित्र राज लक्ष्मण होवाळ (रा. रुक्मिणीनगर झोपडपट्टी, कराड) दुचाकीवरून त्याठिकाणी आला. त्याने जुन्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आकाशच्या गळ्यावर व छातीवर ब्लेडने वार केले. त्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली. पोलिस तपास करत आहेत.