खटाव : सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा कणा असलेल्या खटाव-माण साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गळितास आलेल्या ऊसदराचा एक रकमी हप्ता ३३०० रुपये प्रति टन प्रमाणे संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे व को-चेअरमन व आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
ते म्हणाले, सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दरवाढ बैठकीत खटाव माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखान्याकडून चांगला ऊसदर देण्याबाबत शेतकऱ्यांना अभिवचन देण्यात आले होते. त्यानुसार कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसास एकरकमी प्रति टन ३३०० रुपये हा भाव देण्यात येणार आहे. एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस घातला आहे,त्यांचे उसबिल त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
खटाव-माण कारखान्याची यशस्वीरित्या घोडदौड सुरु आहे. कारखान्याचा चालू हंगामात ऊसाच्या ज्यूसपासून तर इतरवेळी बी-हेव्हीपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प मोठ्या दिमाखात सुरु आहे. दरम्यान चालूवर्षी साखरेची एम.एस.पी. वाढण्याची शक्यता आहे. ती वाढल्यानंतर यापेक्षाही अधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न कारखाना करणार आहे. तसेच यावर्षी ऊसाचा एकरकमी रक्कम देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला. तसेच कारखान्याने ऊसबिल योग्य वेळेत देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ती यावर्षीही कायम राहील, त्यामध्ये सातत्य राहील. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस खटाव-माण अॅग्रो कारखान्यास गळीतास पाठवावा, असे आवाहन घार्गे व घोरपडे यांनी केले आहे.
यावेळी कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे संचालक विक्रम घोरपडे, कृष्णत शेडगे,राहुल पाटील, प्रिती घार्गे-पाटील, महेश घार्गे , सनी क्षीरसागर, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक उपस्थित होते.