सातारा : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक व गोडोली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली अथवा कार्यान्वित न केलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनंजय विष्णू कदम यांनी दिला आहे.
या संदर्भात नगराध्यक्ष मा. श्री. अमोल मोहिते यांना दिलेल्या निवेदनात कदम यांनी म्हटले आहे की, सन 2017 पासून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करूनही नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणा एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सायंकाळनंतर प्रचंड वाहन व नागरिकांची वर्दळ असते. वाहतूक पोलीस अनेक वेळा कागदपत्र तपासणीत गुंतलेले असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. अलीकडील वाहतूक व्यवस्थेतील बदलांमुळे कोरेगावकडून येणाऱ्या वाहनांना वळण घेताना अडचणी येत असून दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिल्हा परिषद व गोडोली परिसरात मोठी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये व सर्किट हाऊस असल्याने दिवस-रात्र वाहन व पादचारी वर्दळ असते. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहने भरधाव वेगाने जात असून जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे धोकादायक बनले आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
नगरपरिषदेकडून 2022 मध्ये रस्ते रुंदीकरणानंतर सिग्नल सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र चार वर्षे उलटूनही रस्ते रुंदीकरण व सिग्नल यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही, याकडेही कदम यांनी लक्ष वेधले. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक, गोडोली चौक व जुने आर.टी.ओ. चौक येथे नवीन व अद्ययावत सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करून वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.