संगम माहुली - क्षेत्र माहुली येथील घाट आणि नदीपात्र विकसीत करण्यात यावे!

श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

by Team Satara Today | published on : 27 February 2025


सातारा : संगम माहुली - क्षेत्र माहुली सातारा येथील घाट आणि नदीपात्र विकसीत करण्यात यावे, अशी मागणी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, कैलास स्मशानभूमी चे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कैलास स्मशानभूमी येथील गॅस दाहिणीच्या लोकार्पण समारंभावेळी आपण संगम माहुली येथील कृष्णा वेण्णा या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची भावना व्यक्त केली होती. सातारा जिल्ह्याचे आपण वर्षे 2005 चे दरम्यान पालकमंत्री होता. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण जिल्ह्यात विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केला होता. विविध ठिकाणी केलेल्या विकास कामांमुळे आपणास सातारा जिल्ह्याची संपुर्ण माहिती आहे.

पुढे चोरगे यांनी म्हटले आहे, सातारा येथील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगम माहुली - क्षेत्र माहुली या गावांच्या काठावर कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम होतो. क्षेत्र माहुली परिसरात पूर्व बाजूस रामेश्वर मंदिर व प्रशस्त असा दगडी घाट आहे, तर संगम माहुली परिसरात पश्चिम बाजूस काशी विश्वेश्वरांचे भव्य असे दगडी मंदिर आहे. या परिसरात पुरातन अशी 100 च्या आसपास मंदिरे आहेत. याच ठिकाणी श्री. छ. शाहु महाराज व श्री. छ. महाराणी सईबाई यांची समाधी स्थळे आहेत. यामुळे ऐतिहासिक, धार्मिक तसेच नैसर्गिक संपदेमुळे महाराष्ट्रातील तसेच सातारकर नागरिकांची या परिसराबाबत भावनिक आस्था निर्माण झाली आहे.

सातारा शहर, शहरालगतचा परिसर आणि लगतच्या 15 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांसाठी या परिसरात नदीकाठी उभारलेल्या कैलास स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार तसेच दशक्रिया विधी केले जातात. या सर्व महत्वाच्या बाबींमुळे या ठिकाणी साधारणत: दररोज 5 ते 10 हजार लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येथे येत असतात. यामुळे संगम माहुली घाट परिसर तसेच नदीपात्रात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता तसेच प्रदुषण निर्माण झाले आहे.

नदीच्या पुर्व बाजुला उंचावर शेती असल्याने आणि मुळ नदी प्रवाह बदलत असल्याने सततच्या नदीच्या प्रवाहाने व पुराच्या पाण्यामुळे या शेती खालील जमीनीची धूप होवून या शेतामधीत माती नदीमध्ये ढासळत असते. यामुळे नदीच्या प्रवाहाच्या पात्रात सुध्दा बदल होत चालला आहे. याच ठिकाणी 200 मीटर अंतरावर नदीच्या पश्चिम बाजूस सातारा शहराला होणार्‍या पिण्याच्या पाण्याचे फिल्टरेशन प्लॅटसुध्दा (जलशुध्दीकरण प्रकल्प) पुर्वीपासून आहे. ओघाने या फिल्टरेशन प्लँटमध्ये प्रदुषित पाणी मिसळत आहे. त्यामुळे सातार्‍याच्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

आपण संगम माहुली येथील ब्रिटीशकालीन पुलाच्या शेजारीच नवीन पुल बांधण्यासाठी मंजुरी देऊन निधीसुध्दा उपलब्ध केला आहे. ही बाब चांगली व गरजेची आहे. यामुळे अनेक वर्षांचा वाहतुकीचा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे. सातारा येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोक सहभागातून उभारलेल्या कैलास स्मशानभूमीस आपण चांगले सहकार्य केले आहे.

नवीन पुलाच्या कामाबरोबरच संगम माहुली येथील जुन्या पुलाच्या 200 मीटर अंतरावर असलेल्या कृष्णा-वेण्णा संगमावर ऐतिहासिक घाटाच्या संगोपनाबरोबरच नवीन घाट बांधून तसेच उंचावर असलेल्या शेतजमीनीची माती पुरांमध्ये वाहून जावू नये यासाठी ठराविक ठिकाणी कॉक्रीटची भिंत उभारून नदीपात्र विकसीत करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आम्हास वाटते.

वरील उल्लेख केल्याप्रमाणे सातारा शहरातील काही भागास याच नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. याच कृष्णा-वेण्णा नदीला सातारा शहरातून येणारे सर्व ओढे जोडले असून अत्यंत दुषित पाणी नदीपात्रात मिसळले जाते. यामुळे ज्याठिकाणी ओढे नदी पात्राला जोडले जातात त्याठिकाणी अद्ययावत असे फिल्टरेशन प्लॅट बसविणे अत्यंत गरजेचे आहे.

कृष्णा-वेण्णा नदीच्या संगम माहुली येथील ऐतिहासिक, धार्मिक तसेच नैसर्गिक संपदेमुळे महाराष्ट्रातील आणि सातारकर नागरिकांची भावनिक आस्था निर्माण झाली आहे. यामुळे या परिसराला आपल्या कार्यकाळात तीर्थक्षेत्राचा दर्जा देवून, आवश्यक त्याठिकाणी घाट बांधून, गरजेनुसार कॉक्रीटची भिंत उभारून, पाणी पुरवठ्यासाठी अद्ययावत असे फिल्टरेशन प्लॅट बसवून या परिसराचे संगोपन झाल्यास परिसराचे पावित्र्य राखले जाईल, असेही राजेंद्र चोरगे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाशिवरात्री जागरण सोहळा उत्साहात संपन्न
पुढील बातमी
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

संबंधित बातम्या