रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे नियोजन

शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 03 June 2025


सातारा : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला असून, त्यानिमित्त पाच व सहा जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सोहळा समितीचे मार्गदर्शन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (ता. पाच) दुपारी साडेतीन वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊसाहेब यांच्या समाधीस अभिवादन केले जाणार आहे. दुपारी चार वाजता संभाजीराजे आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत करून रायगडावर जाण्यास प्रारंभ केला जाणार आहे. सव्वाचार वाजता गडावर नगारखाना येथे गडपूजन केले जाणार आहे.

त्यानंतर रात्री साडेनऊपर्यंत युद्धकला प्रात्यक्षिके, लेझीम ढोल वादन, जागर, गोंधळ, वारकरी संप्रदायातर्फे भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजनाने कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. सकाळी दहा वाजता श्री शिवछत्रपती यांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाणार आहे. त्यावेळी संभाजीराजे महाराज शिवप्रेमींना मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी ११ वाजता पालखी सोहळा, सव्वाबारा वाजता वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले जाणार आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सात तास चौकशी
पुढील बातमी
महायुती सरकारचा मोठा निर्णय

संबंधित बातम्या