वाई : वाई शहरातील गंगापुरीत असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंद घरे फोडत चोरट्यांनी 19 तोळे सोने व रोख रक्कम असा तब्बल सुमारे 15 लाख रूपयांचा ऐवज लांबवला. मध्यवस्तीत भरदिवसा ही घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत विशाल धनाजी जरंडे (मूळ रा. आसरे, सध्या रा. सृष्टी अपार्टमेंट, गंगापूरी, वाई) यांनी फिर्याद दिली आहे. जरंडे हे उंबरवाडी (वेलंग) आणि त्यांची पत्नी विनिता कोंढवली शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सदनिका बंद करून दोघेही शाळेत गेले होते.
दरम्यान दुपारी साडे बाराच्या सुमारास समोरच्या सदनिकेत राहणार्या अक्षय सणस याने जरंडे यांना दोघांच्या सदनिकांचे दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. त्यानंतर जरंडे दाम्पत्य त्वरित घरी आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी कपाट फोडलेल्या अवस्थेत व कपडे अस्ताव्यस्त टाकल्याचे निदर्शनास आले. अक्षय यांच्या घरातूनही 10 हजारांची रोकड लांबवली असल्याचे समोर आले आहे.