दहिवडी : माणदेशातील जैवविविधतेचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाच्या उद्देशाने ‘माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्ट’च्या पथकाने कुकुडवाड परिसरात राबवलेल्या तीन दिवसीय वन्यजीव निरीक्षण मोहिमेत एका दुर्मीळ व संकटग्रस्त पक्ष्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत असलेल्या नेपाळी गरुडाचे दर्शन घडले. या गरुडाची माण तालुक्यात पहिलीच नोंद ‘ई-बर्ड’ या जागतिक पक्षीविषयक संकेतस्थळावर झाली आहे.
या मोहिमेदरम्यान संकटग्रस्त नेपाळी गरुडासोबतच आठ ते दहा युरोपियन नीलपंख या स्थलांतरित पक्ष्यांचेही निरीक्षण करण्यात आले. याशिवाय वनस्पतींमध्ये दुर्मीळ कंदीलपुष्पाचीही नोंद झाली आहे. नेपाळी गरुडाची छायाचित्रे वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. या महत्त्वपूर्ण नोंदींमुळे कुकुडवाड परिसराचे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने असलेले जागतिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्टचे प्रमुख चिन्मय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि वनस्पती अभ्यासक अजित काटकर यांनी या तीन दिवसीय मोहिमेचे नेतृत्व केले. क्षेत्रीय निरीक्षण, पक्षी व वनस्पतींच्या नोंदी तसेच अधिवासाचा अभ्यास करून परिसरातील जैवविविधतेविषयी महत्त्वपूर्ण शास्त्रीय माहिती या मोहिमेद्वारे संकलित करण्यात आली.
सध्या माणदेशात कमी पर्जन्यमान, तीव्र पाण्याची टंचाई आणि आव्हानात्मक पर्यावरणीय परिस्थिती आहे. असे असतानाही येथील गवताळ प्रदेश आणि काटेरी झुडपांचे अधिवास अनेक दुर्मीळ वन्यजीवांना आणि स्थलांतरित पक्ष्यांना आश्रय देत आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे होणारे अधिवासाचे नुकसान आणि पाण्याची कमतरता यामुळे या संवेदनशील परिसंस्थांचे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे.
कुकुडवाड भागात नेपाळी गरुडाचा विहार; माण तालुक्यात पहिलीच नोंद, ‘युरोपियन नीलपंख’ पक्षीही आढळले
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा