कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्चला मंत्रालयात बैठक - डॉ. भारत पाटणकर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

by Team Satara Today | published on : 26 February 2026


सातारा :  महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली,सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह व श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळासह दि. ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक लावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले चार दिवस सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले. 

ते जिल्हाधिकारी कार्यालयालय येथे सुरू असलेल्या आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या समोर बोलत होते. यावेळी संतोष गोटल, ऍड. शरद जांभळे, प्रकाश साळुंखे, किसन सुतार, आनंद सपकाळ, गुलाब काटे, मनोहर निकम, श्रीपती माने, पांडुरंग लाड, इंदूबाई थोरवडे यांनी आपल्या सरकार बाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. 

डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी ज्या बलाढ्य शत्रूला गनिमी काव्याने पराभूत केले, त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा तोच गनिमी कावा वापरून लढा दिला आहे. आम्ही आजपर्यंत बोगस प्रकल्पग्रस्त आहेत म्हणत होतो, ते आजच्या शासनाच्या दप्तरी नोंद झाले असून त्याची आकडेवारी आम्हाला मिळाली आहे, आणि खऱ्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन शंभर टक्के होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हाच आजचा विजय आहे. 

ते पुढे म्हणाले की, कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत जी भिंत आडवी येत होती, तिचा पायाच आज या आंदोलनाने खिळखिळा केला असून, पुढील काळात ही भिंत आपोआपच ढासळून पडेल आणि लवकरात लवकर कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप सुरू  करण्याचा मार्ग मोकळा होईल. ही लढाई आम्ही जिंकली असून यामध्ये काही दगा फटका झाला किंवा सरकारने टाळाटाळ केली तर पुढील काळात जो लढा होईल तो सरकारला पूर्ण नामोहरम केल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही डॉ. पाटणकर यांनी यावेळी दिला.

यावेळी गणेश भिसे, संदीप कांबळे, धम्मरक्षित रणदिवे, स्वाती उथळे, गणेश वाघमारे, एकनाथ लाड, दाजी शेलार, रामभाऊ शेलार, ज्ञानबा भोसले, किसन जाधव, प्रभाकर चव्हाण, कृष्णाबाई थोरवडे,  यांच्यासह मोठ्या संख्येने कोयना धरणग्रस्त स्त्री पुरुष उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागरिकांच्या जिव्हाळ्याचे अंदाजपत्रक तयार करा; महाविकास आघाडीची मागणी, नगराध्यक्षांना निवेदन सादर
पुढील बातमी
कंग्राळकर असोसिएटसच्या लँडमार्क टॉवर्सला “वेल बिल्ट स्ट्रक्चर” पुरस्कार प्रदान; संपूर्ण टीमचे साताऱ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन

संबंधित बातम्या