सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही लढलो. पण निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना तसेच महायुतीचा धर्मही पाळण्यात आला नाही. महायुती म्हणून एकत्र राहणे अपेक्षित होते. पण, तसे चित्र दिसलेच नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. बेईमानी आमच्या रक्तात नाही, असा अप्रत्यक्षरीत्या आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेवर केला आहे. तसेच बॅंकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही त्यांनी जाहीर करून टाकले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे नूतन संचालक नंदकुमार मोरे, अर्जुन काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर मंत्री गोरे हे विश्रामगृहावर दाखल झाले होते.
मंत्री गोरे म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक झाली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक एकत्र लढविण्याची सूचना केली होती, त्याप्रमाणे लढलो. पण, प्रत्यक्षात महायुतीचा धर्म पाळण्यात आलाच नाही.
माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनचे सहकारी असणारे व आताचे संचालक अर्जुन काळे यांच्या मतात तो फरक दिसून आला आहे. मुख्यमंत्री तसेच त्यांच्याही पक्षाच्या नेत्यांच्याही सूचना मतदानावेळी पाळल्या नाहीत. महायुतीतील घटक हे अर्जुन काळे यांच्या विरोधात होते. तरीही काळे हे विजयी झाले आहेत. सहकारात येताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावेत असे म्हटले जाते. पण, येथे ते सिद्ध झालेले नाही.
या निवडणुकीतून खूप काही शिकलो...
आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वचपा काढला का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी काही गोष्टी अनुभवातून शिकायच्या असतात. पण, आताची ही निवडणूक खूप काही शिकवून गेली आहे. मी जिल्हा बॅंकेत पोहोचलोच. तसेच शिलेदारांनाही घेऊन गेलो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वेगळे लढलो असतो तर भाजपच विजयी...
मंत्री गोरे यांनी निवडणुकीत अर्जुन काळे यांना कोणत्या तालुक्यातून किती मतदान झाले याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावरुन पत्रकारांनी काळे यांना सातारा, जावळी तालुक्यांतही मतदान कमी झाल्याचा प्रश्न केला. यावर मंत्री गोरे यांनी याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबर चर्चा करू. कारण, येथील जबाबदारी त्यांच्यावर होती, असे सांगितले. तसेच जिल्हा बॅंकेची निवडणूक भाजप स्वतंत्र लढली असती तर काय झाले असते हे सांगण्याची गरज नाही. कारण, आम्ही पक्ष आणि व्यवस्था म्हणूनही जिंकलो असतो, असे त्यांनी सांगून टाकले.
निवडणुकीत महायुतीचा धर्मही पाळण्यात आला नाही; जयकुमार गोरे यांचा राष्ट्रवादी-शिंदेसेनेवर आरोप, बेईमानी आमच्या रक्तात नाही
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा