सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या शाहू चौकामधील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज जनसागर उसळला होता. यावेळी मान्यवरांच्यावतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. येथील शाहू चौकाचा परिसर हा विविध फुलांनी सजवण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. साताऱ्यातील डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासंदर्भात वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. हे स्मारक लवकरच अस्तित्वात आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साताऱ्यात उत्साह दिसून आला. यावेळी शैक्षणिक साहित्य व संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी वामन मस्के, ॲड. विलास वहागावकर, अनिल वीर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य प्रदेश महासचिव दादासाहेब ओव्हाळ, रमेश उबाळे, वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, चंद्रकांत खंडाईत, संजय गाडे, पूजा बनसोडे, गणेश भिसे, समता सैनिक दलाचे प्रज्वल मोरे, अरुण पोळ, श्याम रोकडे, अरुण पवार, आदित्य गायकवाड, गणेश कारंडे, ऋषिकेश गायकवाड, उमेश खंडूझोडे, दामिनी निंबाळकर, राजू ओव्हाळ, सलीम बागवान, सलीम शेख उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या संहितेच्या प्रतींना प्रसाराच्या दृष्टीने वितरण करण्यात आले. या वितरण मोहिमेला साताऱ्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. येथील ग्रंथालय तसेच स्मारक परिसर हा अत्यंत देखण्या पद्धतीने सुशोभित करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेबांनी माणुसकीचा संदेश दिला : ना. शिवेंद्रसिंहराजे
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगर विकास आघाडीचे पक्षप्रताप अमोल मोहिते यांच्या समवेत शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यानामध्ये येऊन तेथे आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून माणुसकी समता तसेच वंचितांसाठी काम करण्याचा विचार आपल्या कृतीतून दिला तेच विचार त्यांनी राज्यघटनेमध्ये सुद्धा मांडून ठेवले आहेत. त्यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे आणि राज्यघटनेतील तत्वे प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे.