कराड : वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष पुजनासाठी जाणार्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्यचे गंठण धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघा संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रूपा संदिप कदम (वय 38, रा. कदम वस्ती, गोळेश्वर रोड, ता. कराड) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रूपा कदम या मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वटवृक्ष पुजनासाठी नातेवाईक महिलेसोबत जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोन संशयित आले आणि त्यांनी काही समजण्यापूर्वीच सौ. कदम यांच्या गळ्यातील साडेआठ तोळ्यांचे 55 ग्रॅमचे एक आणि 25 ग्रॅमचे दुसरे गंठण हिसकावत तेथून दुचाकीवरून पळ काढला. यावेळी पाठीमागून येणार्या एका वाहन चालकाने संशयितांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडू शकले नाहीत.
संशयितांनी नंबर प्लेट नसणार्या दुचाकीचा वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सौ. कदम यांनी पती तसेच अन्य नातेवाईकांसोबत कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत संशयितांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.