युवकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेले तीनही हल्लेखोर जेरबंद

सातारा शहर डीबी पथकाची अप्रतिम कारवाई

by Team Satara Today | published on : 30 January 2025


सातारा : सातारा शहरात परीक्षेसाठी आलेल्या युवकावर अनोळखी युवकांनी कोयत्याने हल्ला करून हे युवक फरार झाले होते. अत्यंत क्लिष्ट असलेल्या या गुन्ह्याचा तपास सातारा शहर डीबी पथकाने करून यासंबंधी तीन जणांना अटक केली आहे.

वैष्णव सुभाष ननावरे वय 19 राहणार पवारवाडी वर्धनगड तालुका खटाव, जय राहुल ठोंबरे वय 19 राहणार आजादपूर तालुका कोरेगाव,  शंकर जाधव वय 19 राहणार आदर्श नगर तालुका कोरेगाव अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून या तिघांनी जिल्हा रुग्णालय मार्गावर गाडी आडवी मारून फिर्यादीला कोयता मारून जखमी केले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर चारचाकी वाहनातून परीक्षेसाठी आलेल्या युवकावर अनोळखी युवकांनी मोटरसायकल वरून येऊन, वाहनास मोटरसायकल आडवी मारून युवकावर कोयत्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डीबी पथकास या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यातील जखमी फिर्यादी हा बारामतीतील राहणारा असून तो परीक्षेसाठी सातारा येथे आला होता. त्यास एक वर्षापूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वर्धनगड तालुका कोरेगाव येथील एका युवकाने त्याच्यावर वॉच ठेवून दोन अन्य साथीदारांसोबत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीररीत्या जखमी केले होते.

तसेच चालू महिन्यामध्ये जखमी फिर्यादीच्या मित्रास बारामती याठिकाणी मारहाण झाली होती. त्याचा हा मित्र असल्याने व त्यास मदत केल्याने त्याचा राग मनात धरून मला मारले असावे, असे फिर्यादी याने सांगून काही संशयितांची नावे पोलिसांना सांगितली होती. परंतू संशयातील मुलांची पोलिसांनी गोपनीय चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला नसल्याचे प्राथमिक तपासत समजून आले.

जखमी फिर्यादी यास आपणास मारहाण का व कशासाठी केली व कोणी केली याबाबत काहीच माहीत नव्हते. तसेच त्याला मारहाण झालेल्या ठिकाणचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले नाही. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणणे व आरोपींचा शोध घेणे कठीण व क्लिष्ट झाले होते. परंतु सातारा शहर डी.बी. पथकाने कौशल्यपूर्वक गोपनीरित्या माहिती संकलित करून काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्यातून माहिती प्राप्त करून तीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून सातारा शहर डी.बी. पथकाने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करून सातारा शहर डीबी पथकाने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, कोयता व मोबाईल असा एकूण दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवलदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरासह तालुक्यातील तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी संपुर्ण सातारा जिल्ह्यातून तडीपार
पुढील बातमी
लग्नाच्या बहाण्याने सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या