सातारा : प्रतापगड-कोल्हापूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आसगाव (ता. सातारा) येथील पाच युवकांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव बालाजी दनाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेत अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. या शिष्टमंडळात गणेश कारंडे, चंद्रकांत खंडात, पी. व्ही. कांबळे, अनिल वीर आणि विलास वाहागावकर यांचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, आंबेनळी घाटातील दुर्घटनेमुळे पाच कुटुंबांनी आपल्या कर्त्या सदस्यांना गमावले असून अनेक दिवस उलटूनही त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने संवेदनशील भूमिका घेत प्रभावित कुटुंबांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच आंबेनळी घाटातील अपघातप्रवण ठिकाणांची सर्वंकष तपासणी करून तेथे सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची आवश्यकता आघाडीने अधोरेखित केली. विशेषतः धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, इशारा फलक तसेच अन्य आवश्यक सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील काळात व्यापक लोकआंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.