मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची कबुली; ज्यांना महत्त्वाची पदे दिली तेच भाजपमध्ये गेल्याची खंत

by Team Satara Today | published on : 24 November 2026


सातारा : जिल्ह्यात काँग्रेसची झालेली पीछेहाट ही माझीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्री असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळण्याच्या प्रयत्नात साताऱ्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील चार सहकाऱ्यांना महत्त्वाची पदे देऊन त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चारही जण भाजपमध्ये गेले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख प्रामुख्याने मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे होता.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सकाळ’च्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी त्‍यांनी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि सांगलीत विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम सुरू असताना साताऱ्यात पक्षाची वाताहात का झाली? या प्रश्नावर त्यांनी पक्षाच्या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारली.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मी थेट दिल्लीतून महाराष्ट्रात आलो होतो. त्यापूर्वी राज्यात काम केले नव्हते. अचानक महाराष्ट्राची जबाबदारी मिळाल्याने राज्यकारभार कसा करायचा, याची सुरुवातीला काळजी होती. त्यामुळे मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे फार लक्ष देता आले नाही; पण जिल्ह्यातील चार सहकाऱ्यांना महत्त्वाची पदे देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज ते चारही नेते भाजपमध्ये गेले आहेत.’’


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रॉयल ट्विंकल, सिट्रसच्या ५५६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच; गुंतवणूकदारांकडून ८,८५२ कोटी गोळा केल्याचा आरोप

संबंधित बातम्या