तुकाराम मुंढे फक्त चौकशी आयोगात, 'एमपीएससी'शी संबंध नाही; मुंढे म्हणाले, "माझी FDA मधून बदली झालेली नाही"

by Team Satara Today | published on : 13 October 2026


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा गदारोळ माजला होता. याचाच परिणाम म्हणजे पुण्यात या परीक्षार्थींनी १० दिवसांपेक्षा जास्त दिवस आंदोलन केले. या आंदोलनात आमदार रोहित पवारांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवित आंदोलनात सहभाग घेतला होता. अखेरीस राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे विद्यार्थ्यांसोबत चर्चेला आले होते आणि चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच 'एमपीएससी'च्या विविध परीक्षांमधील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकारने रविवारी निर्णय घेतला.
या चौकशी आयोगात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सचिव म्हणून काम करणार आहेत. पण समाज माध्यमांवर तुकाराम मुंढे हे एमपीएससीचे सचिव झाले आहेत, अशा आशयाची खोटी माहिती पसरवली जात होती. तसेच आता मुंढे आल्यानंतर आयोगाच्या सर्व परीक्षा वेळेत आणि व्यवस्थित होतील, असा दावाही केला जात होता. त्यांची बदली महाराष्ट्र लोकसेवा आयोगात झाली आहे, अशा पोस्ट व्हायरल होत होत्या. पण मुंढे हे केवळ चौकशी आयोगात काम करणार आहेत. या चौकशी आयोगाने ६० दिवसात अहवाल दिल्यानंतर त्यांचा एमपीएससीच्या कामाशी कोणताही संबंध नसणार आहे. पण वारंवार मुंढेचे नाव एमपीएससीशी जोडले जात असल्याने त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तुकाराम मुंढेंची सूचक पोस्ट!
या पोस्टमध्ये तुकाराम मुंढेंनी त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागातून कुठेही बदली झाली नाही. ते अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून काम करत आहेत. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची त्यांची लढाई सुरूच राहील, असे सांगितले. यामुळे आता मुंढे यांची कुठेही बदली झाली नाही आणि समाज माध्यमावरील खोट्या माहितीला खुद्द मुंढेंनी उत्तर दिल्याने या विषयावर पडदा पडला आहे. यापूर्वीही तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनातून बदल्या झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळीही मुंढे यांनी हा दावा खोडून काढला होता आणि आताही मुंढेंना त्यांच्या समाज माध्यमावर बदली न झाल्याची माहिती द्यावी लागली.
चौकशी समितीला ६० दिवसात अहवाल द्यावा लागणार
तर दुसऱ्या बाजूला ‘प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे,’ असे आश्वासन शिवेंद्रराजे भोसले यांनी परीक्षार्थींना यावेळी दिले. एमपीएससीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जो आयोग स्थापन करण्यात आला आहे त्यामध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचे अध्यक्ष, तर तुकाराम मुंढे सचिव असतील. पोलिस अधिकारी लखमी गौतम, माजी सनदी अधिकारी गणेश पाटील आणि माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक हे सदस्य असतील. समितीला चौकशी पूर्ण करून ६० दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यूकेमधील संस्था, उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, महाराष्ट्र-यूके भागीदारीचा मुंबईत शुभारंभ
पुढील बातमी
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला मिळणार बळ

संबंधित बातम्या