यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, सातारा – १९९८ च्या बॅचचा २७ वर्षांनी भावनिक स्नेह मेळावा

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाच्या १९९८ च्या बॅचने तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत एक संस्मरणीय आणि भावनांनी भरलेला स्नेहमेळवा नुकताच पार पाडला.

आयुष्यात आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेल्या, संसारात गुंतलेल्या, मुलांमुलींच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या सर्व मित्रमैत्रिणींनी अनेक अडचणींवर मात करत, वेळ काढून, इच्छाशक्ती आणि परस्पर समन्वयाच्या जोरावर या अनोख्या क्षणाची उभारणी केल्याचा प्रवास एकमेकांसमोर मांडला.

स्नेहमेळावाची सुरवात सकाळी आपल्या महाविद्यालयात भेट घेऊन झाला. जुन्या वर्गखोल्या, कट्टे, लायब्ररी आणि आता बदललेली कॉलेजची रचना पाहताना अनेक आठवणींनी डोळे पाणावले. हसणं, खिदळणं, जुन्या गोष्टींची उजळणी, आठवणींचा पुल बनत होता आणि प्रत्येकाच्या मनात त्या जुन्या दिवसांचं सोनं पुन्हा उजळून निघालं.

नंतर थोडं मोकळेपण अनुभवण्यासाठी साऱ्यांनी मिळून "कास पठार" या निसर्गरम्य ठिकाणी भेट दिली. फुलांच्या सान्निध्यात, थंड वाऱ्याच्या सहवासात एक सुंदर मैफल जमली. जुन्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीला नव्याने जिवंत करत, लाईव्ह म्युझिक आणि खेळांनी वातावरण आणखी रंगून गेलं.  अँकर संजय घाटगे आणि विवेक घाटगे यांच्या सुरेल गाण्यानी मैफिल रंगली. काही उत्साही मित्र-मैत्रिणींनी खास स्मृतीचिन्हं देखील दिली, जे या क्षणांची आठवण सदैव जागवतील.

पुन्हा एकदा सकाळी साऱ्यांनी एकत्र येत हलकीशी गप्पांची बैठक घेतली आणि अखेरीस एकमेकांना भेटण्याच्या वचनासह ही मैत्रीची शिदोरी पुन्हा हृदयात साठवत साऱ्यांनी निरोप घेतला.

हा स्नेहमेळावा केवळ एक भेट नव्हती, तर ती होती आपल्या तरुणपणाची आठवण, आपल्या मैत्रीची उजळणी, आणि पुन्हा एकदा "आपण एकत्र होतो आणि आहोत" याची सुंदर जाणीव. 

काळ कितीही बदलला, माणसं कितीही मोठी झाली, परंतु कॉलेजच्या त्या आठवणी आणि मैत्रीचे बंध कधीच संपत नाहीत! हेच यावरून सिद्ध झाले.

या स्नेह मेळव्याचे आयोजन रवी फडतरे, तुषार माने, अविनाश बोधे -इनामदार, जगदीश जगदाळे, योगिता महाबळ,वैभवी बाचूलकर  यांनी केले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'माधुरी'ला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
पुढील बातमी
आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास

संबंधित बातम्या