पोवई नाका–बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावर अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’; काँक्रिटीकरणामुळे चार महिने वाहतूक बदल; एसटीसह ट्रक, डंपर, कंटेनरला पर्यायी मार्ग

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या मार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर च्या मध्यरात्रीपासून ३१ जानेवारी २०२७च्या रात्रीपर्यंत एसटी बस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर तसेच अन्य मालवाहतूक वाहनांना या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३४नुसार वाहतुकीतील हा बदल लागू केला आहे.
पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या रस्त्यावर सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून दुभाजकाच्या एका बाजूची मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यातून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी वाढत आहे. अवजड वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडत असल्याने बांधकामाचा वेग आणि वाहतुकीची शिस्त दोन्ही राखण्यासाठी त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
सातारा बसस्थानकातून मुंबई, पुणे, कोरेगाव आणि सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस तसेच अवजड वाहनांना जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक–पोलीस परेड मैदान–पारंगे चौक–जुना आरटीओ चौक–वाढे फाटा या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
शहराबाहेरून साताऱ्यात दाखल होणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाढे फाटा–जुना आरटीओ चौक–पारंगे चौक–सातारा बसस्थानक या मार्गाने ही वाहने शहरात प्रवेश करू शकतील.
दरम्यान, या वाहतूक निर्बंधातून दुचाकी, चारचाकी, शाळेच्या बसेस, ऑटो रिक्षा, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी वाहतूक नियोजनानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पर्यायी मार्ग असा :
शहराबाहेर जाणारी अवजड वाहने :
जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक → पोलीस परेड मैदान → पारंगे चौक → जुना आरटीओ चौक → वाढे फाटा
शहरात येणारी अवजड वाहने : वाढे फाटा → जुना आरटीओ चौक → पारंगे चौक → सातारा बसस्थानक


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मृतदेहापासून वाहनापर्यंत... अनोळखी तरुणीच्या खुनाचा उलगडा, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून पोलिसांच्या हाती धागे; वडील-चुलता ताब्यात
पुढील बातमी
जमिनीच्या वादातून अन्याय होत असल्याचा आरोप; औंधच्या व्यक्तीचे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

संबंधित बातम्या