औरंगाबाद : श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कारासाठी जीवन संभाजीराव इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या आणि ग्रंथप्रसार करताना वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडणाऱ्या श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ ' संडे क्लब ' आणि देशपांडे परिवारातर्फे हा पुरस्कार दिला जातो. अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.श्री.इंगळे हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी सुमारे तेरा वर्षांपासून प्रयत्नशील राहिले आहेत.त्यासाठी ते सायकलवरील वाचनालयाचा उपक्रम राबवत असून ग्रामीण भागातील सुमारे १४ किलोमिटर परिसरातील वाचकांना त्याचा लाभ होत आहे.या वाचकांत तीनशे शाळकरी मुलांचा समावेश आहे.या परिसरात पर्यावरण जागृती आणि वृक्षारोपण तसेच अन्य विधायक उपक्रम ते राबवत असतात.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समर्थनगर परिसरातील सहजीवन कॉलनीतील ' शून्य ' संकुल परिसरात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठतम अनुवादक आणि इंग्रजी साहित्याचे जाणकार प्राध्यापक संतोष भूमकर राहणार असून चोखंदळ वाचक आणि राजकीय - सामाजिक कार्यकर्ते समीर राजूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.गतवर्षी औरंगाबाद येथील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
