'एक पत्र तिच्यासाठी..!' अश्वमेधचा अभिनव उपक्रम; महिला दिनानिमित्त कै. सारिका मोहिते- यादव स्मृतिप्रीत्यर्थ अनोखी स्पर्धा

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा :  येथील अश्वमेध महिला मंच आणि अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सारिका मोहिते- यादव स्मृतिप्रीत्यर्थ महिला दिना निमित्त 'एक पत्र तिच्यासाठी..!' ही पत्र लेखन स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती अश्वमेध ग्रुपचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती-झुटिंग यांनी पत्रकाद्वारे दिली.

तुमच्या आयुष्यात ज्या स्त्रीने प्रेम, आधार आणि प्रेरणा दिली, तुमचे आयुष्य समृद्ध केले, त्या स्त्रीला शब्दांची भेट देवून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची नामी संधी अश्वमेध उपलब्ध करून देत असल्याची भावना अश्वमेधचे उपाध्यक्ष डी. एम. मोहिते यांनी व्यक्त केली.

आपण ज्यांच्यामुळे घडतो त्या स्त्रियांप्रती आभार मानणे, घरात संवादाची नवी दारे उघडणे, केवळ शुभेच्छा नव्हे, तर महिलांप्रती आदर आणि समज वाढवणे, आई, बहीण, पत्नी, मुलगी या प्रत्येक नात्याची वेगळी ओळख अधोरेखित करणे या प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून घरात प्रेम आणि सवांद वाढेल, पुरुषांमध्ये भावनिक अभिव्यक्तीची सवय लागेल, ⁠मुलांना "स्त्री सन्मान" याचे उदाहरण मिळेल, ⁠महिला दिन केवळ औपचारिकता न राहता अर्थपूर्ण होईल अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 'सर्वोत्कृष्ट भावनिक पत्र', 'सर्वात प्रेरणादायी पत्र', 'कुटुंब समृद्ध करणारे पत्र', 'हृदयस्पर्शी पत्र' अशा लेखनाला रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल - विषय : आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी यांना पत्र लेखन करणे. शब्दमर्यादा : 300 शब्द, भाषा : मराठी, सदर लेखन 8 मार्च पर्यंत पोहचतील अशा पद्धतीने प्रत्यक्ष अथवा पोस्टाने अश्वमेध युवक ना. सह. पतसंस्था, 380 सोमवार पेठ, व्यकंटेशविश्व अपार्टमेंट, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा (संपर्क : 751 741 1999) या पत्त्यावर द्यावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने सौ. रोहिणी महेश कुंदप यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास; वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश
पुढील बातमी
साताऱ्यात खा. गांधींच्या फोटोला जोडे मारत शिवसेनेचे आंदोलन ; आंदोलनकर्त्यांवर देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात यावा

संबंधित बातम्या