सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने होत असलेला आणि मागील दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी सातार्यातील यादोगोपाळ पेठेच्या पोरे बोळ परिसरातील नागरिकांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. महिलांनी पाण्याची रिकामी भांडी रस्त्यावर मांडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे राजवाड्याकडून बोगद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली.
आंदोलनाची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रभागाचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संदीप सावंत यांनीही पाहणी करून गणेश टाकीकडील उताराच्या भागात नवीन बॉल व्हॉल्व बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या आश्वासनानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
पालिकेच्या माहितीनुसार, पोरे बोळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. यापूर्वी व्हॉल्व दुरुस्त करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, कास योजनेतील पाणीपुरवठ्यातील अडथळे, वीज नियमनामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी तसेच गणेश टाकीला अपुरा पाणीपुरवठा यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली.
याशिवाय, विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे काही कर्मचारी त्या कामात व्यस्त असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या तांत्रिक पथकावर ताण वाढला असून तक्रारींच्या निवारणास विलंब झाल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, परिसरातील काही नागरिक निळ्या पाणीवाहिनीला थेट विजेच्या मोटारी जोडून पाणी उपसत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. त्यामुळे इतर भागांतील नागरिकांना कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून समान पाणीवाटप सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.