सातारा : आपल्या राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच महत्वाची असते. या विभागामार्फत विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व महत्वाची विकासकामे करून जनतेला सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रसकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी दिली.
मुंबई येथे ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत ना. पवार बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पीय तरतुदी संबंधित मुद्द्यांवर व्यापक विचारविनिमय करून विभागाच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमुळे विभागाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीच्या उपलब्धतेस गती मिळण्याची शक्यता असून भविष्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.