सातारा : कर्नाटक आणि गोवा मार्गे गांजाची होलसेल तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, टोळीच्या म्होरक्यासह तिघांना पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील तलावाजवळ रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईत २२ किलो गांजासह वाहने असा एकूण १२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष दिनकर माने (वय ४७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण), राजकिरण जयवंत मोरे (वय २६, रा. मालधन, ता. पाटण) आणि सोमनाथ रघुनाथ मंडले (वय ३६, रा. माजगाव, ता. पाटण, जि. सातारा) यांचा समावेश आहे. यापैकी संतोष माने हा टोळीचा म्होरक्या असून, तो पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महामार्गावर सापळा रचून कारवाई
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या नशामुक्त अभियान सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील काही तस्कर गांजाच्या उलाढालीसाठी उजळाईवाडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे, वैभव पाटील, संतोष बरगे आणि त्यांच्या पथकाने रात्री उशिरा पुणे–बंगळूर महामार्गालगत उजळाईवाडी तलावाजवळ सापळा रचला. संशयितांची हालचाल लक्षात येताच पोलिसांनी झडप घालून तिघांना ताब्यात घेतले.
अंगझडतीत २२ किलो गांजा जप्त
पोलिसांनी संशयितांची अंगझडती घेतली असता राजकिरण मोरे याच्या ताब्यातून २ किलो गांजा सापडला. तर टोळीचा म्होरक्या संतोष माने आणि सोमनाथ मंडले यांच्या मोटारीतून २० किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत गांजासह संबंधित वाहने आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, एकूण मुद्देमालाची किंमत १२.१७ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
स्थानिक तस्करांशी संबंधांचा संशय
ही टोळी कर्नाटकासह इतर राज्यांतून गांजा आणून कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक तस्करांना पुरवठा करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उजळाईवाडी परिसरात ते कोणाला गांजा देण्यासाठी आले होते, तसेच हा साठा नेमका कोठून आणला आणि कोणासाठी आणला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात स्थानिक कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे.
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान तस्करीच्या साखळीतील इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि पुरवठा जाळ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नशाविरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई कोल्हापूर पोलिसांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.