उंब्रज : शेजाऱ्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याने झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका मजूर महिलेने आत्महत्या केली. ही घटना वडगाव, उंब्रज ता. कराड येथे घडली आहे. वंदना परशुराम विटकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विजय विष्णू भिसे (४२) असे उंब्रज पोलिसांनी अटक केलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत परशुराम काशीनाथ विटकर (४०, रा. वडगाव, उंब्रज, मूळ रा. कोकणनगर, जि. रत्नागिरी) यांनी उंब्रज पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी विटकर यांची मुलगी आणि शेजारी राहणाऱ्या विजय भिसे यांची मुलगी यांच्यात वाद झाला होता. या वादाबाबत वंदना विटकर यांनी भिसे यांच्या घरी जाऊन समजावून सांगितले होते.
त्यानंतर विजय भिसे याने विटकर यांच्या घराजवळ येऊन वंदना विटकर यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. तसेच रात्री वंदना विटकर या आजीला समजावून सांगण्यासाठी गेल्या असता, भिसे याने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. विजय भिसे याने दिलेल्या त्रासाला कंटाळून वंदना विटकर यांनी शनिवार, दि. ३ रोजी दुपारी साडेबारापूर्वी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून उंब्रज पोलिसांनी विजय भिसे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शेजाऱ्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याने त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; उंब्रज पोलिसांत दाखल एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा