सातारा : जावली तालुक्यातील रांजणी येथील पवार वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून एका कुत्र्याला ठार केले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
बिबट्याने रात्रीच्या वेळेस हल्ला करून शरद पवार यांच्या पडवीमध्ये बांधलेल्या कुत्र्याला ओढत नेताना घरातील महिलांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने कुत्र्याला जागेवरच सोडले. मात्र, त्याने कुत्र्याची मान धरल्याने कुत्रा जागीच ठार झाला होता. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याने कुत्रावर हल्ला केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी नेताजी वासुदेव आणि लांगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या पायाची ठशांची पाहणी करण्यात आली. तसेच त्यांनी परिसराची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले.
वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्याचा वावर आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. लहान मुलांना एकटे बाहेर जाऊ देऊ नये, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत आणि शक्यतो रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, बिबट्याची दहशत वाढल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून मानवी जीवितास धोका निर्माण होणार नाही.