पुसेसावळीतील माय-लेकीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ; ​मणेराजुरी परिसरातील हृदयद्रावक घटना

by Team Satara Today | published on : 12 June 2026


पुसेसावळी : मजुरीसाठी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे गेलेल्या पुसेसावळी येथील माय-लेकीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अचानक घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे पुसेसावळीसह संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. सत्त्वला संतोष जाधव (वय २८) आणि मंजू संतोष जाधव (वय १०, रा. पुसेसावळी) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधव यांचे कुटुंब दरवर्षी पावसाळी हंगामात मोलमजुरी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी परिसरात जात असते. नेहमीप्रमाणे सुमारे महिनाभरापूर्वी ते आपली पत्नी सत्त्वला, मुली मंजू व अंजू, तसेच अविनाश आणि रोहित या दोन लहान मुलांसह मणेराजुरी येथे वास्तव्यास आले होते. बुधवारी दुपारी सत्त्वला जाधव या आपल्या चार मुलांसह चिमणखोरा पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या तलावाच्या काठावर कपडे धुण्यात व्यस्त असताना, त्यांची मुलगी मंजू ही आंघोळ करण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक पाय घसरल्याने ती खोल पाण्यात ओढली गेली व बुडू लागली. आपल्या पोटच्या लेकीला पाण्यात बुडताना पाहून आई सत्त्वला यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. परंतु, दुर्दैवाने त्यांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्या दोघीही खोल पाण्यात बुडाल्या.

​तलावाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या अंजू या लहान मुलीने हा थरार पाहताच तात्काळ आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिने अत्यंत तत्परता दाखवत जवळ असलेल्या मोबाईलवरून आपले वडील संतोष जाधव यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संतोष जाधव आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विशाल टकले हे आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून दोन्ही मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढले. अविनाश (वय ९) आणि रोहित (वय ५) या चिमुरड्या मुलांच्या डोळ्यांदेखतच त्यांची आई आणि बहिणीचा अंत झाल्याने अत्यंत हृदयहेलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली होती. लहान मुलांचा तो आर्त आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी येथे अपघातात 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख किरकोळ जखमी

संबंधित बातम्या