सातारा : साताऱ्याच्या डोंगररांगा आणि यवतेश्वर घाटाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ६) दहा हजार धावपटूंच्या सहभागाने ‘पुनित बालन ग्रुप सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२६’ रंगणार आहे. देश-विदेशातील धावपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदान येथून होणार आहे. छत्रपती घराण्यातील सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धावपटूंना हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून धावपटूंच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्ग सज्ज झाले आहेत. स्पर्धेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्री-रेस एक्स्पोचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. मुख्य स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहरातून घाटाकडे धावण्याचा मार्ग
पोलीस कवायत मैदानातून सुरू झालेली मॅरेथॉन पवई नाका, शाहू चौक आणि बोगदा मार्गे यवतेश्वर घाटाकडे जाईल. यवतेश्वर मंदिराच्या पुढे प्रकृती हिल रिसॉर्टपर्यंत धावपटूंचा मार्ग असेल. तेथून पुन्हा याच मार्गाने पोलीस कवायत मैदानाकडे परतल्यानंतर स्पर्धेचा समारोप होणार आहे. विजेत्यांना याच मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनची ओळख केवळ स्पर्धा म्हणून नसून, आव्हानात्मक चढ-उतार आणि निसर्गरम्य वातावरणातील धावण्याचा अनुभव देणारी स्पर्धा म्हणून निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे धावपटूंसोबतच क्रीडा पर्यटनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक समितीने आयोजनाची तयारी केली आहे.
वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचा भर
दहा हजार धावपटू सहभागी होणार असल्याने रविवारी पहाटेपासून शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात बोगदा परिसरातील वाहतूक परिस्थितीनुसार वळविण्यात येणार असून वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांचीही मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता असून, त्यामुळे सातारा शहरात रविवारी सकाळी क्रीडा वातावरण निर्माण होणार आहे. यवतेश्वर घाट आणि साताऱ्याच्या निसर्गरम्य परिसरातून होणाऱ्या या स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील ओळखीबरोबरच पर्यटनविषयक आकर्षणालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यवतेश्वर घाटात आज धावणार दहा हजार धावपटू; सातारा हिल हाफ मॅरेथॉनची जय्यत तयारी; सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदानातून प्रारंभ
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा