छत्रपती संभाजीनगर- "देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नीट (NEET) परीक्षेच्या घोळामुळे १ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जोपर्यंत देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आम्ही त्यांचा राजीनामा घेऊनच राहू," असा आक्रमक पवित्रा कॉक्रोच जनता पार्टीचेअभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जर येत्या ६ दिवसांत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दिपके म्हणाले, "जर देशाचे पंतप्रधान रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात, तर ते देशातील पेपर लीक का थांबू शकत नाहीत? या सर्व प्रकरणाची जबाबदारी कुठेतरी निश्चित झाली पाहिजे. सिस्टीम तेव्हाच फिक्स होईल जेव्हा कोणीतरी याची जबाबदारी स्वीकारेल."
"मी कालच अमेरिकेतून भारतात आलो आणि थेट जंतर-मंतरला गेलो. तेथील जागा अपुरी पडेल एवढी गर्दी तरुणांची होती. ज्यांना संशय आहे त्यांनी तिथले फोटो पाहावेत. तुम्ही देशाचे वाटोळे करून टाकले आहे. मुलांना रोजगार नाही, परीक्षा नीट घेतल्या जात नाहीत. पण आता या देशातील तरुण सरकारला घाबरणार नाही, तो आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार, असेही अभिजीत दिपके म्हणाले.
प्रश्न विचारणाऱ्यांना 'पाकिस्तानी' म्हणणे कधी थांबवणार?
आंदोलकांवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना दिपके यांनी संताप व्यक्त केला. "वेदांत नावाच्या १७ वर्षांच्या सीबीएसईच्या विद्यार्थ्याने जेव्हा मार्कशीटमधील घोळ उघड केला, तेव्हा त्याला मीडिया आणि सरकारने 'पाकिस्तानी' म्हटले. तुम्ही पत्रकारांना, बेरोजगारांना, प्रश्न विचारणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणता, मग भारतीय आहे तरी कोण? फक्त भाजप आणि आयटी सेलवालेच भारतीय आहेत का? आम्ही आंदोलने कोणत्या एका पक्षासाठी करत नाही, तर तरुणांच्या मुद्द्यांसाठी करत आहोत."
"देशात दरवर्षी ५० लाख विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडतात. मात्र, त्यापैकी फक्त २० लाख तरुणांना नोकऱ्या मिळतात. उर्वरित ३० लाख पदवीधरांना नोकरी मिळत नाही, ही आजची शोकांतिका आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय असते, फक्त पाच वर्षांतून एकदा मतदान करणे म्हणजे राजकारण नाही, तर निवडून दिलेल्यांना प्रश्न विचारणे म्हणजे खरे राजकारण आहे. आई-वडिलांना मुलांच्या सुरक्षिततेची भीती वाटते, पण जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत ही सिस्टीम सुधारणार नाही, असेही दिपके यांनी नमूद केले.
अराजक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मला संताप येतो
दिपके म्हणाले, "मी जेव्हा 'जय भीम'ची घोषणा देतो, तेव्हा त्यांना ते अराजकतावादी वाटते का? त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे. जे आंबेडकरांचे संविधान मानतात, जय भीम म्हणतात, त्यांना अराजक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मला संताप येतो, अशी टीका दिपके यांनी केली.