महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातून तापोळयाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता व मोरीचा भाग पालिका हद्दीत फळणे वस्तीनजीक खचल्यामुळे वाहतूक मंदावली. याबाबतची माहिती नागरिकांनी पालिकेला दिल्यानंतर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाय योजना करण्यात आल्या. त्यानंतर सकाळी खडी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. गेली काही वर्षे वरचेवर याच भागात रस्ता खचण्याचे घडलेल्या प्रकारावर कायमस्वरूपी उपायोजना करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
महाबळेश्वर तापोळा रस्त्याचे विघ्न संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. महाबळेश्वर शहरातील सेठ गंगाधर माखीरया हायस्कूल ते कारवी आळा पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे हाल होत आहे. उन्हाळी हंगामात खड्डे धुळीच्या त्रासांनंतर या पावसाळी हंगामात खड्डे, चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे.
मात्र, त्यानंतर पुन्हा एक समस्या आ वाचून उभी राहिली आहे. महाबळेश्वर ते तापोळा एकमेव मुख्य रस्त्यावर फळणेवस्ती नजीक मुख्य रस्ता व मोरीचा भाग खचला असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा मोठा धोका निर्माण झाला. याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी पालिका अधिकार्यांना याची माहिती दिली.
तापोळा भागाकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे दळणवळणाची समस्या निर्माण होऊ शकते. अखेर पालिका मुख्य लिपिक बबन जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी करून सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बॅरिकेटस् लावून रस्ता एकाबाजूने बंद करण्यात आला व हलक्या वाहनासाठी एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी खडी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असून वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.