सातारा : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर १८ मार्च १७७७ रोजी तिसऱ्यांदा स्वराज्यात समावेश करण्याच्या ऐतिहासिक मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर राजर्षी खंडेराव बर्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बुधवारी शौर्य, पराक्रम व अभिमान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेला २५३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोरेगाव येथील बर्गे कुटुंबीयांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात रायगडावर अभिवादन सोहळा साजरा केला.
अभिमान दिनानिमित्त पहाटे साडेपाच वाजता कोरेगाव येथील बाजारपेठ मैदानात बर्गे कुटुंबीयांसह शहरातील सर्व प्रभागातील नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती. नियोजनानुसार अकरा बसमधून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या जयघोषात किल्ले रायगडकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी बसेस पुढे विधिवत श्रीफळ वाढविण्यात आला.
गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्वांनी गडाचे दर्शन घेऊन पवित्र माती कपाळी लावली. त्यानंतर युवकांनी पायऱ्यांमार्गे पायी चढाई केली, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रोपवेच्या माध्यमातून गडावर प्रवेश केला.
या सोहळ्यात कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग सुतार, ज्येष्ठ नागरिक फत्तेसिंह बर्गे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग बर्गे, नलिनी बर्गे, वंदना शिंदे, उल्का मालुसरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
रायगडावर पोहोचल्यानंतर राजदरबारातील मेघडंबरीतील सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक श्रेयस दीपक बर्गे यांनी शौर्य व अभिमान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या जयघोषात रायगड दणाणून सोडला. मुख्य कार्यक्रमानंतर होळीचा माळ, श्री जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराजांची समाधी यांचे पूजन करण्यात आले. तसेच राजदरबार, महादरवाजा, राणीवसा, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी बुरुज, गंगासागर तलाव आदी ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात आल्या.