सातारा : सातारा जिल्ह्याला खासदार, आमदार, मंत्री आणि नगरपालिका अशा विविध पातळ्यांवर राजकीय ताकद लाभली; मात्र या सत्तेचे प्रतिबिंब क्रीडा सुविधांच्या विकासात दिसत नसल्याची टीका काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सादिकअली अमीर बागवान यांनी केली.
क्रीडांगणांसाठी आरक्षित असलेल्या जागा वर्षानुवर्षे पडून असताना साताऱ्यातील खेळाडूंना सरावासाठी मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना बागवान यांनी जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या प्रश्नावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले. “राजकीय पदे आणि सत्ता असताना तरुणांच्या क्रीडा क्षेत्रासाठी ठोस काम का झाले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शासनाकडून क्रीडा संकुलांसाठी मोठ्या निधीच्या घोषणा होतात; मात्र प्रत्यक्षात त्यातील किती निधी खर्च झाला, किती कामे पूर्ण झाली आणि कोणत्या सुविधा निर्माण झाल्या, याचा पारदर्शक हिशोब जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे बागवान म्हणाले.
सातारा जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक आणि विस्तारकामांच्या निविदांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आधुनिक क्रीडा सुविधा उभ्या राहत असताना साताऱ्यातील खेळाडूंना अद्याप दर्जेदार मैदान आणि सरावाच्या सुविधा मिळत नसल्याने गुणवंत खेळाडूंच्या संधी मर्यादित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
क्रीडांगणांसाठी आरक्षित जागांचा तातडीने विकास करून त्या खेळाडूंसाठी खुल्या कराव्यात, तसेच क्रीडा निधीचा सार्वजनिक हिशोब सादर करावा, अशी मागणी बागवान यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास तरुण खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.