सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे येथे शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुकाराम सिद्धू होनमाने (वय ६५, मूळ रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. नागठाणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम होनमाने हे गेल्या अनेक वर्षांपासून नागठाणे परिसरात मेंढ्या चारण्याचे काम करत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास नागठाणे गावच्या हद्दीवरील शिवारात ते मेंढ्यांसाठी भुईमुगाचे वेल गोळा करत होते. त्यावेळी परिसरात अचानक ढगांचा कडकडाट सुरू होऊन पावसाला सुरुवात झाली.
पावसापासून बचाव करण्यासाठी होनमाने हे शेतातील झाडाजवळ थांबले असताना अचानक जोरदार वीज कोसळली. या विजेचा फटका त्यांना बसल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आय. रफीक काझी व प्रविण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
तुकाराम होनमाने हे दरवर्षी उन्हाळ्यात नागठाणे परिसरात मेंढ्या घेऊन येत असत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते आपल्या मूळ गावी परत जात असत. येत्या दोन दिवसांत ते गावी परतणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.