सातारा : सातारा शहरात दुचाकी चोरी करून मिरजेत लपून बसलेल्या सराईत चोरट्याचा सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोध घेत त्याला अटक केली. अभिजीत भरत पवार (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी, असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरातून ७ सप्टेंबर रोजी दुचाकी चोरीला गेल्यानंतर शहर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचाली तपासताना पवार याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. मात्र, तो सातत्याने ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते.
डी.बी. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार मिरज परिसरात त्याचा माग काढला. सलग दोन दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सातारा शहरातून दुचाकी चोरल्याची माहिती दिल्यानंतर चोरीची वाहने लपवून ठेवलेल्या ठिकाणाची माहितीही पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा दुचाकी जप्त केल्या.
जप्त केलेल्या वाहनांपैकी चार दुचाकींच्या चोरीचे गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अन्य दोन दुचाकी कराड शहर व दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले आहे. या वाहनांचे इंजिन व चेसीस क्रमांक खोडण्यात आल्याने त्यांचा मूळ तपशील तसेच चोरीची पद्धत याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पवार याच्यावर यापूर्वीही आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी हालचालींचाही तपास करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुधीर मोरे, पो.हवा.निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सुशांत कदम, सुहास कदम, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, संतोष घाडगे, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.कॉ.मोरे, पो.कॉ.भास्करवाड यांनी तपासात सहभाग घेतला.
मिरजेत लपून बसला, साताऱ्यातील सहा दुचाकींचा ठाव लागला; डी.बी. पथकाची दोन दिवस पाळत; २.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा