सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बॅरेकेडिंग लावत वाहनचालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणार्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 21 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर,फलटणच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके इत्यादी यावेळी उपस्थित होते
पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता वर्धनगड (ता. खटाव) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी बॅरेकेडिंग करून वाहनचालकांना अडवत पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे खाकी व खाजगी पोशाखातील महिला-पुरुष वाहनांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले. चौकशीत संबंधित व्यक्ती पोलीस खात्यात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी थांबविण्यात आलेल्या मोटारसायकलस्वार ऋषीकेश बाबासो शिरतोडे (रा. नागनाथवाडी) व सूरज लहुकुमार शिरतोडे (रा. ललगुण) यांनी आरोपींनी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून 500 रुपये उकळल्याची माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास दत्तात्रय शिंदे (रा. नागाव रस्ता, ता. वाळवा), वैभव पांडुरंग पवार, राहुल सुनील पाटील, केतन बाबासाहेब महाजन (सर्व रा. मिरज परिसर), प्रियांका रणदीप नाईक (रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रियांका संजय भोरे आणि अरुणा दयानंद आवळे यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून खंडणी उकळल्याची कबुली दिली. कारवाईत टाटा सफारी स्टॉर्म (एमएच-12 एमएफ-3832), मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच-10 सीए-4937), 8 अँड्रॉईड मोबाईल, 2,200 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दर्याबा नरळे व चालक तुषार बाबर यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकार्यांनी पथकाचे अभिनंदन केले.