सातारा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार सोमवारी कराड दौऱ्यावर येणार आहेत. कराडच्या प्रीतिसंगमावर असलेली यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे पवार कुटुंबाचे उर्जास्थळ आहे. त्याठिकाणी नतमस्तक होऊन राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या नव्या इनिंगची सुरूवात करणार आहेत. त्या प्रथमच यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी येत आहेत. सुनेत्रा ताईंच्या या दौऱ्यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या प्रीतिसंगमावरील आठवणींना उजाळा मिळणार आहे.
विमान अपघातात अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानं महाराष्ट्र 'दादा' नेतृत्वाला मुकला आहे. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. परंतु, ज्या अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शान वाढवली, त्या पदावर पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देत अजितदादांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला. सुनेत्रा ताईंनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या कराड दौऱ्यावर येत आहेत.
यशवंत विचारांच्या मुशीत आणि शरद पवारांच्या तालमीत अजित दादांचे नेतृत्व घडले होते. त्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले. तसेच अर्थमंत्री म्हणून विधिमंडळात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. झपाटून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. दरवर्षी २५ नोव्हेंबरला ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी प्रीतिसंगमावर हमखास उपस्थित असायचे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार प्रीतिसंमावर येत आहेत.
दुर्दैवाने यापुढे अजितदादा प्रीतिसंगमावर दिसणार नाहीत. मात्र, तो वारसा आता सुनेत्रा पवार यांनाच पुढे न्यावा लागणार आहे. सोमवारी (२ फेब्रुवारी) पहिल्यांदाच त्या प्रीतिसंगमावर येत आहेत. त्यामुळे कराडकर त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून त्या तरडगावला (ता. फलटण) जाणार आहेत. विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची त्या सांत्वनपर भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळत आहे.