साताऱ्यात राष्ट्रीय पक्षाची शिकार; मोराचे मांस शिजवणाऱ्यास वनविभागाकडून बेड्या

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा रचून शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवणाऱ्या एका संशयिताला सातारा वनविभागाने तत्काळ कारवाई करत बेड्या ठोकल्या. सागर गौतम पवार (वय २५, रा. वरये, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरये परिसरामध्ये मोराची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. तपासात संशयिताने सापळा लावून मोराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने घटनास्थळावरून दोन पातेल्यांमध्ये शिजवलेले मांस, मोराची पिसे, दोन पाय, शिकारीसाठी वापरलेला सापळा, तीन सुरे, सत्तूर, विळीचा लाकडी पाट आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सर्व मुद्देमाल जप्त केला. मोर हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनुसूची-१ मधील अत्यंत संरक्षित पक्षी असल्याने त्याची शिकार करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा ठरतो. जप्त केलेले अवशेष आणि मांस पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनपरिक्षेत्र आणि फिरत्या पथकाने केली असून परिसरात वनविभागाची गस्त वाढवण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सायलेन्सरचा ‘आवाज’ बंद; पोलिसांचा बुलडोझर अ‍ॅक्शन!
पुढील बातमी
विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर साताऱ्यात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन तीव्र; प्रमुख मागण्यांवर ठाम

संबंधित बातम्या