सातारा : वाचाल तर वाचाल... याप्रमाणे चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते.असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे पुस्तक दिन साजरा करण्यात आला. तेव्हा माहिती आणि तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.तेव्हा उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे मार्गदर्शन करीत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, 'खांडेकर ,अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी वगैरेंचे साहित्य हे माणसाची जडणघडण करणारे असते. माणसाला समृद्ध बनवणारे असते.लहानपणी या लेखकांचे साहित्य वाचल्यामुळे मन प्रगल्भ झाले. नगर वाचालयातील विपुल ग्रंथसंपदा आणि उपक्रम अभिनंदनीय आहेत. 170 वर्षापेक्षा जास्त वर्षांची जुनी परंपरा असणाऱ्या या वाचनालयात येऊन आनंद वाटला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन वर्षा पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकपर बोलताना लेखक डॉ.राजेंद्र माने म्हणाले, 'हा पुस्तक दिन थोड्या वेगळ्या वातावरणात साजरा करावा लागत आहे. माणसा-माणसामधील भिंती वाढू नयेत. संवाद शाबूत रहावा. यासाठी ग्रंथवाचन हे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विषयावरची ग्रंथसंपदा माणसाचं मन सजग बनवत असते ..रेशन कार्डावर जितकं नाव महत्त्वाचं त्यापेक्षा जास्त वाचनालयाच्या सभासद कार्डावर आपलं नाव असणं हे महत्त्वाचं ठरेल. तेव्हा माणूस प्रगल्भ बनायला मदत होईल.
प्रारंभी काश्मीर येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले. आभार संचालक डॉ. श्याम बडवे यांनी मानले.सदरच्या कार्यक्रमास पद्माकर पाठक,नरेंद्र जाधव, अनील वीर ,ग्रंथपाल रूपा मुळे, भाग्यश्री शिंदे, अन्वेषा कलेढोणकर, वेदांत कारवे, विष्णू धावडे, विजय दळवी, गौतम भोसले, देशमुख वगैरे वाचक व मान्यवर उपस्थित होते.