सातारा : सातारा शहरातील प्रमुख तीन वर्दळीच्या मुख्य रस्त्यांसह 14 सेवा रस्त्यांवर हजारो खड्डे मुसळधार पावसामुळे पडले आहेत. त्यामुळे सातार्यात वाहन चालकांच्या गाड्यांसह वाहतुकीची अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. मुसळधार पावसाने अद्याप उघडीप न घेतल्याने सातारा पालिकेने खरेदी केलेल्या 20 टन कोल्ड मिक्स ला अद्याप गोडाऊन मध्येच ठेवण्याची वेळ आली आहे.
पालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग पाऊस उघडीप केव्हा देतो आहे, त्याची प्रतीक्षा करत आहेत. पावसाळ्याच्या पूर्वी सातारा पालिकेने जिल्हा नियोजन समितीतून रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला आहे. त्यातील प्रायोगिक तत्त्वावर अजिंक्य कॉलनी ते कनिष्क मंगल कार्यालय यादरम्यान कॉंक्रीट चा पहिला रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. सातारा शहरातील राजपथ, कर्मवीर पथ, राधिका रोड या रस्त्यांवर शहरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने ठिकठिकाणी खड्ड्यांची मालिका सुरू झाली आहे. या तीन रस्त्यांवर मिळून तब्बल 250 पेक्षा जास्त खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी सातारकरांना अपेक्षा आहे. सातारा शहर हे शाहूकालीन सुनियोजित शहर आहे. त्यामुळे सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. त्या सेवा रस्त्यांवरही प्रचंड खड्डे पडल्याने सातारकरांना वाहनावरचा प्रवास म्हणजे चंद्रावरची यात्रा वाटू लागला आहे.
पालिकेकडून कोल्ड मिक्स ची खरेदी
सातारा पालिकेने डांबरीकरणापेक्षा पाण्यातही न सुकणारे वेस्टन कोल्ड मिक्स हे 20 टन मिश्रण खरेदी केले आहे. यामध्ये कार्बन व बीट्युमिनस या रसायनांचा वापर केला जातो. हे मिश्रण चिकट असल्याने ते खड्ड्यामध्ये भरले जाते आणि सुकलेल्या परिस्थितीमध्ये खड्डा पूर्णतः भरला जातो आणि वाहनांचे खड्ड्यांचे अडथळे टाळले जातात. मात्र त्यासाठी मुसळधार पावसाने उघडीप देणे गरजेचे असते. सातारा शहरात यंदा गेल्या सव्वा महिन्यातच सरासरीपेक्षा 76 टक्के जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. तब्बल वीस लाख रुपयांचे कोल्ड मिक्स गोडाऊनमध्ये पडून राहिले आहे. बांधकाम विभागाने नियोजन तर केले आहे. मात्र पाऊस केव्हा उघडणार, याची वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
खड्ड्यांची मालिका
राजपथ - 114 खड्डे
कर्मवीर पथ - 87 खड्डे
राधिका रोड - 180 खड्डे
वायसी कॉलेज रस्ता - 22 खड्डे
समर्थ मंदिर परिसर - 32 खड्डे
राधिका चौक ते बुधवार नाका - 44 खड्डे
हुतात्मा चौक - 28 खड्डे
सातारा शहरांमध्ये दर्जेदार रस्ते बनवण्यासाठी सातारा पालिकेने पावसाळ्यानंतर सुधारित रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला असून जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधी मागितला जाणार आहे. सध्या खड्डे भरण्यासाठी 20 लाखाचे वीस टन कोल्ड मिक्स खरेदी करण्यात आले आहे. श्रावणानंतर पावसाचा जोर कमी होईल. त्यावेळी पूर्ण उघडीप मिळाल्यानंतर रस्त्यातील खड्डे दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल.
- प्रतीक वैराट, नगर अभियंता,
सातारा नगरपरिषद, सातारा