दिल्ली : सणासुदीच्या काळात देशातील लाखो कामगारांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेती, बांधकाम आणि देखभाल तसेच रस्ते व इमारतींच्या कामांमध्ये कार्यरत कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ ऑक्टोबर २०२६पासून लागू झाली आहे. महागाईच्या दरानुसार महागाई भत्त्यात वाढ झाल्याने विविध श्रेणीतील कामगारांच्या किमान वेतनातही वाढ झाली आहे. कामगारांचे वेतन त्यांच्या कौशल्यानुसार तसेच कामाच्या ठिकाणाच्या एरिया A, B आणि C या वर्गीकरणानुसार वेगवेगळे निश्चित करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रातील कामगारांसाठीही सुधारित किमान वेतन लागू करण्यात आले आहे. एरिया A मधील अकुशल कामगारांना आता किमान ५३७ रुपये प्रतिदिन मिळणार आहेत. यामध्ये ३३३ रुपये मूळ वेतन आणि २०४ रुपये महागाई भत्ता समाविष्ट आहे. याच क्षेत्रातील अत्यंत कुशल कामगारांसाठी किमान वेतन ७०५ रुपये प्रतिदिन निश्चित करण्यात आले आहे. तर एरिया B मधील अकुशल कामगारांना किमान ४९१ रुपये, तर एरिया C मधील अकुशल कामगारांना ४८६ रुपये प्रतिदिन वेतन मिळणार आहे.
बांधकाम आणि देखभाल क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये रस्ते, रनवे, इमारती, वीज आणि कम्युनिकेशनसाठीच्या भूमिगत केबल्स, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन तसेच सीवर लाइनशी संबंधित कामांचा समावेश आहे. एरिया A मधील अकुशल बांधकाम कामगारांचे किमान वेतन आता ८४० रुपये प्रतिदिन झाले आहे. तर अत्यंत कुशल कामगारांना किमान १,१११ रुपये प्रतिदिन वेतन मिळणार आहे.
एरिया B मध्ये बांधकाम क्षेत्रातील अकुशल कामगारांचे किमान वेतन ७०४ रुपये, तर अत्यंत कुशल कामगारांचे किमान वेतन १,०२४ रुपये प्रतिदिन असेल. तर एरिया C मध्ये या दोन्ही श्रेणीतील कामगारांना अनुक्रमे ५६५ रुपये आणि ९३३ रुपये प्रतिदिन मिळणार आहेत. याशिवाय अर्धकुशल आणि कुशल कामगारांच्या वेतनातही त्यांच्या कौशल्याची पातळी आणि कामाच्या क्षेत्रानुसार वाढ करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबरपासून नवा महागाई भत्ता लागू
महागाई भत्ता (DA) हा कामगारांच्या वेतनाचा असा भाग आहे, ज्यामध्ये वाढत्या महागाईचा विचार करून वेळोवेळी बदल केला जातो. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि इतर खर्च वाढल्यामुळे कामगारांच्या उत्पन्नावरील परिणाम कमी करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारकडून औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्याचे पुनरावलोकन केले जाते. यावेळी हा निर्देशांक ४२४.८० वरून ४३१.४२ इतका वाढला आहे. म्हणजेच निर्देशांकात ६.६२ अंकांची वाढ झाली आहे. या वाढीच्या आधारे १ ऑक्टोबर २०२६पासून सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.
देशातील लाखो कामगारांबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय; महागाई भत्त्यात वाढ; १ ऑक्टोबरपासून किमान वेतनही वाढणार
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा