सातारा : सातारा शहरातील शुक्रवार पेठ येथील विकसकाने करारनाम्याप्रमाणे जागेचे विकसन करून ठरलेल्या जागांच्या सदनिका यादोगोपाळ पेठेतील बेंदाडे कुटुंबीयांना अद्याप दिलेल्या नाहीत. या गोष्टीला साडेतीन वर्ष उलटली असून या विकसकाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात बेंदाडे कुटुंबीयांनी सातार्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर श्रीमती सरस्वती बाबुराव बेंदाडे वय 50, मोहन बाबुराव बेंदाडे वय 59, ओंकार मोहन बेंदाडे वय 32, भाग्यश्री मोहन बेंदाडे वय 35, संजय बाबुराव बेंदाडे वय 49, सुनीता संजय बेंदाडे वय 45, अनिल बाबुराव बेंदडे वय 45, संगीता अनिल बेंदाडे वय 41, ज्योती संदीप बेंदाडे वय 42, प्रसाद संदीप बेंदाडे वय 20, प्रियांका संदीप बेंदाडे 23 एकाच कुटुंबातील 11 जणांनी बिल्डरच्या फसवणुकीच्या विरोधात प्रशासनाकडे दान मागितले आहे.
निवेदनात नमूद आहे की, यादोगोपाळ पेठेत बेंडाळे कुटुंबीयांची सिटी सर्वे क्रमांक 63 /अ / 1अ या जागेमध्ये वडिलोपार्जित मिळकत आहे. ही मिळकत सातार्यातील विश्वविनायक ग्रुप ला विकसित करण्यासाठी देण्यात आली होती. 60-40 नियमाप्रमाणे विकसन करारनामा ठरला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून विकसक विनाकारण आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप बेंदाडे कुटुंबीयांनी करत संबंधित विकसकाच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. हा विकसक आम्हाला फोनवरून येथून निघून जा, माझे मी काय करायचे ते बघतो, अशा धमकीवजा इशारे देत आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा बेंदाडे कुटुंबियांनी दिला आहे. बेंदाडे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सातारा, प्रांत व तहसीलदार सातारा यांना याबाबतचे तक्रार अर्ज पाठवले आहेत. याप्रसंगी न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.