पवारांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिले नाही? : ना. शिवेंद्रराजे

by Team Satara Today | published on : 01 September 2025


सातारा : तामिळनाडूचे दिलेले आरक्षण हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होण्याअगोदर दिलेले आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही. ज्यावेळी शरद पवार हे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे 69 टक्के आरक्षण का दिले नाही? मराठा आरक्षण त्यावेळेस गांभीर्याने का घेतले नाही? जरांगे यांना मराठा समाज म्हणून ताकद मिळाली आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. शरद पवार यांना लगावला.

ना. शिवेंद्रराजेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विरोधकांनी सत्तेत असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले नाही. देवेंद्र फडणवीस पूर्वी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते ते विरोधकांचे सरकार असताना टिकले नाही. विरोधकांनी यापूर्वी प्रयत्न केलेच नाहीत. सकल मराठा समाजाचे मोर्चे निघाले. सातारा जिल्ह्यातून मीही मोर्चात होतो.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा काय? यावर ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक पार पडली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून कायदेशीर चर्चा सुरू आहेत. आरक्षणावर लवकरच समाधानकारक तोडगा निघेल. मराठा समाजाला सरसकट कुणबी करा व टिकावू आरक्षणाबाबत ना. शिवेंद्रराजे म्हणाले, याबाबत ना. देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावयाचे आहे. तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होऊ नये म्हणून कायदेशीर आरक्षणाबाबतचा निर्णय झाला पाहिजे. त्या पद्धतीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

सुप्रिया सुळेंनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला यावर ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजाला आम्ही तुमच्याबरोबर आहे ही दाखवायची संधी मिळाली आहे. आता, जाताय, बोलताय मग त्यावेळी का आरक्षण दिले नाही?

मराठा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे. उपसमितीच्या बैठकीत बरेचशे निर्णय झाले आहेत. जरांगे यांच्याबाबत झालेल्या चर्चेत काही मुद्दे ठेवले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक निशाणा साधत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही साधता येतंय का? हा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही ना. शिवेंद्रराजे यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण, दमदाटी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी
पुढील बातमी
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचना

संबंधित बातम्या