दोन गावठी कुत्र्यांनी शिकारीला आलेल्या बिबट्याला नेले फरफटत

by Team Satara Today | published on : 23 August 2025


नाशिक : आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांचा बळी गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, निफाड तालुक्यातील दिंडोरी तास येथील शेतकऱ्याच्या दोन गावठी कुत्र्यांनी शिकारीला आलेल्या बिबट्यावरच हल्ला चढविल्यानंतर बिबट्याने त्यातून कशीबशी सुटका करून घेत पळ काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे.

निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याचा अधिवास आढळतो. बिबट्याने आजवर मानवांसह पशुधन, कुत्रे यांच्यावर हल्ले करीत त्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, गुरुवारी रात्री कुत्र्यांनीच बिबट्यावर हल्ला चढवत त्याला पिटाळून लावल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या दिंडोरी तास फाट्याजवळ तलावालगत असलेल्या कैलास दिनकर गांगुर्डे व योगेश फकिरा गांगुर्डे यांच्या वस्तीवर आला.

तेथे दोन कुत्रे बसलेले पाहताच बिबट्या कुत्र्यांच्या दिशेने चालून गेला. मात्र, हे कुत्रेच आपला जीव वाचविण्यासाठी बिबट्यावर तुटून पडले. यात गांगुर्डे यांच्या टॉमी नावाच्या गावठी कुत्र्याने या बिबट्याचा जबडा आपल्या तोंडात पकडून ठेवल्याने बिबट्याला हालचाल करणे अवघड झाले.

टॉमी कुत्र्याने जबड्याच्या बाजूने, तर दुसऱ्या कुत्र्याने बिबट्याच्या दुसऱ्या मागच्या बाजूने तोंडाने धरून अक्षरशः या बिबट्याला फरफटत नेले.  

या घटनेबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गांगुर्डे यांच्या वस्तीवर पोहोचले व घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.   टॉमी नावाचा कुत्रा आहे. २ ते ३ कुत्र्यांशी एकाचवेळी सामना करू शकतो, असे श्वानमालक योगेश गांगुर्डे यांनी सांगितले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर
पुढील बातमी
तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान

संबंधित बातम्या