फलटण प्रांत कार्यालयातील त्या लाच प्रकरणाने सातारा महसूल विभाग गॅसवर; 'एसीबी'च्या पुढील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष

by Team Satara Today | published on : 02 September 2026


फलटण: जमीन फेरफार अपिलातील विलंबमाफी अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल मिळवून देण्यासाठी फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या नावे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंट विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. सातारा 'एसीबी'च्या नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी पदार्पणातच थेट प्रांत कार्यालयाशी संबंधित प्रकरणात धडक कारवाई केल्याने सातारा महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मौजे टाकळवाडे (ता. फलटण) येथील तक्रारदार शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन सहहिस्सेदाराने परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आल्यानंतर, त्यांनी सदर फेरफार रद्द करण्यासाठी फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयात विलंबमाफीसह अपील दाखल केले होते. या कामाच्या पाठपुराव्यादरम्यान ओळखीचा खासगी एजंट विकास तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांकडून फेरफार अपिलामधील विलंबमाफी अर्ज मंजूर करवून अनुकूल निकाल मिळवून देण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या नावे ५० हजार रुपये आणि स्वतःसाठी निकालानंतर १० हजार रुपये अशा लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने सातारा एसीबीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौक परिसरात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांवर वैयक्तिक प्रभाव टाकून काम करून देण्याच्या बहाण्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर सापळा रचून आरोपी विकास तोडकर याला ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
दरम्यान, या कारवाईत केवळ खासगी एजंटला जाळ्यात पकडून कारवाई अर्धवट ठेवण्यात आल्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. या प्रकरणातील आरोपी तोडकर याचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि फलटण प्रांताधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या लाचखोरीतील 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' समोर येईल. संबंधित अधिकारी सध्या हात झटकून 'तो मी नव्हेच' म्हणत ' नामा निराळा होण्याचा प्रयत्न केला आहे. पण कितीही प्रयत्न करत असले, तरी या पडद्यामागे काहीतरी काळेबेरे शंभर टक्के शिजल्याचे उघड दिसत असून, आता 'एसीबी'च्या पुढील तपासाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई एमआयडीसीत बावळेश्वर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
पुढील बातमी
पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन : शेंद्रे येथे दोन दिवसीय भव्य एक्स्पो; १० हजार धावपटूंची उपस्थिती

संबंधित बातम्या