कराड : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा अभियानांतर्गत कराडला आज, गुरुवारी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला शहरवासीयांचा भव्य प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये ३२५ फूट लांब व १० फूट रुंदीचा तिरंगा ध्वज विद्यार्थिनींनी हातात घेतला होता. हा ध्वज रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला.
सुमारे १० हजारावर शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी व कराडकर नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २ तास चाललेल्या या तिरंगा रॅलीमध्ये 'भारत माता की जय' या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. शहरभर देशप्रेमाचे वातावरण तयार झाले होते.
गुरुवारी सकाळी १० वाजता लाहोटी कन्या शाळा येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर,गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे,सहकार उपनिबंधक अपर्णा यादव,मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, कराडचे नगरसेवक विजय वाटेगावकर,शिवाजी पवार, आशुतोष डुबल,अजय पावसकर तसेच तिरंगा रॅलीमध्ये शहर व परिसरातील माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. त्यांचा संयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
तिरंगा रॅली कन्या शाळा, चावडी चौक, आझाद चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकात पोहोचली. यात शाळा,महाविद्यालयांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. 'भारत माता की जय' घोषणा देत हे विद्यार्थी रॅलीमध्ये जोश आणत होते.तिरंगा रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद ओसंडून वाहत होता.
सांगता समारंभात बोलताना डॉ.अतुल भोसले म्हणाले, कराड शहरात आज काढण्यात आलेली तिरंगा रॅली ही ऐतिहासिक ठरली आहे. सुमारे १० हजार शालेय विद्यार्थी आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात नागरिक यात सहभागी झाले. प्रशासनाने अतिशय चांगले नियोजन करून देश प्रेम वृध्दिंगत करण्याचे काम केले आहे.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, हर घर तिरंगा अभियानांतर्गत कराडमध्ये काढण्यात आलेली तिरंगा रॅली ही प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम बळकट करण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. प्रस्ताविक प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.आभार तहसिलदार कल्पना ढवळे यांनी मानले.