सातारा जिल्ह्यात 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियान संपन्न

by Team Satara Today | published on : 10 September 2025


सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा पुढाकार तसेच विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान राबविलेल्या 'श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सातारा जिल्ह्यात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग तथा विविध आरोग्य संस्था व गणेशोत्सव मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला होता. आत्तापर्यंत झालेल्या 607 शिबिरांमध्ये एकूण तब्बल 35694 लोकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे. यामध्ये 16 हजार 270 पुरुष 16 हजार 969 महिला तसेच 2 हजार 455 बालके लाभार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. नागरिकांच्या आरोग्य तपासणी सोबतच आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करण्यासाठीचे अभियान देखील आरोग्य यंत्रणा व मंडळांमार्फत राबवण्यात आले होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी संलग्न रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संलग्नित रुग्णालय तसेच, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय केंद्रांच्या माध्यमातून सदर शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन केले गेले. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळानी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. गणेश मंडळामध्ये आलेल्या भाविकांचे बीपी, शुगर, इसीजी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच इएनटी तपासणी केली गेली. त्याचप्रमाणे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या दुर्धर रोगांच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व उपचार करून देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर शासकीय योजना मार्फत कशाप्रकारे साहाय्य मिळेल याबाबतचे प्रबोधन शिबिरांमध्ये आणि गणेश मंडळांच्या मार्फत करण्यात आले.

त्याचप्रमाणे विसर्जन मार्गावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. ही मोहीम केवळ तपासणी पुरती मर्यादित न राहता सातत्यपूर्ण आरोग्य नियोजन हा यामागील मुख्य उ‌द्देश आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड उत्तरच्या विकासासाठी 96 लाखांचा निधी
पुढील बातमी
सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 7 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर

संबंधित बातम्या