संबोधीचा उपक्रम ध्येयाचे स्वप्न पेरणारा - प्राचार्य डॉ.संजय कांबळे; संबोधी प्रतिष्ठानतर्फे सातारा शहरातील ४० शाळा, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : संबोधी प्रतिष्ठानचा समाजातील सर्व थरातील प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा उपक्रम सर्वोत्तम ध्येयाचे  स्वप्न पेरणारा व भारतीय संविधानाला अभिप्रेत समतेचे मूल्य रुजवणारा आहे, असे मत श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले जैन कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य  डॉ. संजय कांबळे यांनी व्यक्त केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील विविध चाळीस शाळा- महाविद्यालयातील दहावी बारावीत उत्तम गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या उपयुक्त, ओबीसी तसेच खुल्या अशा सर्व प्रवर्गातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा  प्राचार्य संजय कांबळे, आयुर्विमा महामंडळाचे पुणे येथील निवृत्त वरिष्ठ अधिकारी भास्कर फाळके व प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.शरद गायकवाड यांच्या हस्ते गौरव चिन्ह,शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे' शिवाजी कोण होता?' भारतीय संविधान  पुस्तके तसेच सोबत पर्यावरण पूरक विविध भाजी पाल्यांच्या बिया देऊन  सन्मान  करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य संजय कांबळे बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे संघटक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, सहकार्यवाह डॉ.सुवर्ण यादव, विश्वस्त डॉ.यशपाल सावंत उपस्थित होते.

प्राचार्य संजय कांबळे म्हणाले, आजचे युग ज्ञानाचे, स्पर्धेचे व बुद्धिमत्तेचा कस लावणारे आहे. याचे भान ठेवून ध्येय निश्चित करावे. जगात नवनवीन होणारे संशोधन,माहिती ज्ञानाचे रूपांतर   बुद्धिमत्ता व शहाणपण  वाढवण्यात झाले पाहिजे. प्रचंड वाचनाद्वारे आकलन, तर्कशुद्ध विचारायची समज वाढवण्याबरोबरच उत्तम आहाराद्वारे  आरोग्यही नीट सांभाळण्याची गरज आहे. उत्तम प्रशासकीय सनदी अधिकारी व्हायचे असेल तर तुकाराम मुंडे यांच्या संघर्षाचाआदर्श समोर ठेवण्याची गरज आहे.

डॉ. शरद गायकवाड म्हणाले, भारतीय संविधान हा राष्ट्रधर्म आहे. त्याचे रक्षण झाले पाहिजे. उत्तम शिक्षण संपादनाबरोबरच महापुरुषांनी दिलेला समतेचा विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून चांगला माणूस बनण्याची आकांक्षा धरली पाहिजे.  याप्रसंगी भास्कर फाळके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एकोणिसाव्या वर्षातील या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी रयतच्या आप्पासाहेब पाटील इंग्लिश स्कूलची अक्षरा योगेश कोळेकर, महाराजा सयाजीराव हायस्कूल कला शाखेतील अथर्व संभाजी कारंडे, न्यू इंग्लिश स्कूलची अवनी दीपक गायकवाड, गुरुकुलची इकरा महमदअली पटवेगार  यांनी उत्स्फूर्तपणे  मनोगते व्यक्त केली.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयपाल सावंत यांनी  प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन   केले व आभार मानले. डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सातारा शहरातील ४० शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिरवळला महामार्गावर भरधाव मोटार घुसली ट्रकखाली; वाठार स्टेशनचे दांपत्य जखमी

संबंधित बातम्या