न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

रिले पद्धतीने पूर्ण केले १२५ किलोमीटरचे अंतर

सातारा : स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन सुमारे दीडशे वर्षे कार्यरत असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेची सातारा येथे न्यू इंग्लिश स्कूल ही सहा डिसेंबर १८९९ मध्ये स्थापन झालेली मराठी माध्यमाची शाळा, आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची १२५ वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सव दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० विद्यार्थ्यांनी रिले पद्धतीने १२५ किलोमीटरचे अंतर पार केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी १२५ किलोमीटर रिले पद्धतीची दौड, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित केली होती. या दौडचे वैशिष्ट्य म्हणजे १२५ व्या वर्षपूर्तीनिमित्त १२५ विद्यार्थी, १२५ किलोमीटरचे अंतर, १२५ ऐतिहासिक स्थळांचे स्मरण करत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना स्पर्श करून यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या ऐतिहासिक दौडचे उद्‌घाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता कुंदनमल फिरोदिया सभागृह, फर्ग्युसन आवार येथे नियमक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत जर्सीचे अनावरण करून व रिलेचे बॅटन हस्तांतरित करून, मान्यवर व सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. रविवारी ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून पहाटे चार वाजता या दौडची सुरुवात उत्साहात झाली.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, छत्रपती शिवरायांच्या निवासाने पुनीत झालेला लाल महाल, शनिवारवाडा, श्री. गोळवलकर गुरुजी स्तंभ, लोकमान्य टिळक यांचा निवास असलेला केसरी वाडा अशा अनेक स्थळांजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणेच्या स्वयंसेवकांद्वारे रांगोळ्या घालून, फटाक्यांची आतषबाजी करून, तसेच सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांच्या साक्षीने फुलांची उधळण करत दौडचे भव्य स्वागत करण्यात आले. दौड सुलभ व्हावी, यासाठी निवृत्त मुख्याध्यापक सुनील शिवले व पुणे येथील संस्थेच्या शाळांचे क्रीडा शिक्षक, श्रीकांत विंचू, स्वप्नील देशमुख, महेश जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मागील बातमी
दाट आणि काळ्याभोर केसांसाठी 'या' पद्धतीने करा आवळ्याचा वापर
पुढील बातमी
जिल्हा बँकेत ९.०० टक्के व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना कार्यान्वीत : श्री. नितीन पाटील, अध्यक्ष

संबंधित बातम्या