खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू

by Team Satara Today | published on : 30 October 2024


सातारा : सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दिवाळीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तिकीट दरवाढीच्या तक्रारी वाढत असतात. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ट्रॅव्हल्स संघटनांसोबत चर्चा करून त्यांना नियमापेक्षा जास्त तिकीट दर आकारण्यात येवू नये अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय सातार्‍याच्यावतीने राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व महामार्गावर वायूवेग पथकामार्फत ट्रॅव्हल्सची तपासणी युध्दपातळीवर हाती घेण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.

पथकांकडून गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यातून महामार्ग, जिल्हा मार्गावर धावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 213 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 71 बसेस दोषी आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वायूवेग पथकाला तपासणीमध्ये विना परवाना, परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालवणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या बाबी आढळून आल्या. दि. 9 नोव्हेंबर अखेर ट्रॅव्हल्सची तपासणी आरटीओमार्फत करण्यात येणार आहे.

महामार्गासह जिल्हा मार्गावर आरटीओच्या वायू वेग पथकामार्फत ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात येत आहे. नियमभंग केलेल्या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. ही कारवाई यापुढे सुरूच राहणार आहे. - दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर
पुढील बातमी
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातून 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल

संबंधित बातम्या