सातारा : सातारा तालुका पोलिसांनी विशेष तांत्रिक कौशल्याच्या तपासाद्वारे वेगवेगळ्या जिल्ह्यातून हरवलेले 76 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. हा मुद्देमाल तब्बल 11 लाख 40 हजार रुपयांचा आहे. यापैकी 53 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सातारा तालुका पोलिसांना निर्देशित केले होते. सीआयएसआर पोर्टलच्या माध्यमातून सातारा तालुका पोलिसांनी विशेष पथक बनवून या तपासाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही मोहीम हाती घेतली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 मोबाईल गहाळ झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि अथक शोध या माध्यमातून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 53 मालकांना मोबाईल देण्यात आले असून उर्वरित 23 मोबाईल देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या तपास मोहिमेमध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, विद्या कुंभार, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, सीआयएसआर पोर्टलचे काम पाहणार्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा देशमुख, फणसे यांनी सहभाग घेतला.