कराड : तालुक्यातील घोगाव (शिवाजीनगर) येथील घोगाव तलावालगतच्या इनामदार वस्तीवर एकाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. शिवाजी दिनकर साळुंखे (वय ४३) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी साळुंखे यांचा जनावरांचा गोठा आहे. ते जनावरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी ते वीज सुरू करण्यासाठी गेले होते. पाणी उपसा आदेशामुळे महावितरणने वीजपुरवठा बंद केला होता.
मात्र परंतु मुख्य वीज प्रवाह चालू होता, वीजप्रवाह खंडित असल्याचे समजून साळुंखे यांनी लगतच्या डीपीवर चढून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र डीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद उंडाळे पोलिस दूरक्षेत्रात करण्यात आली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास उंडाळे पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस करीत आहेत.
वायरमन कधीच वेळेत फोन उचलत नाही
शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तत्काळ महावितरणच्या संबंधित वायरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे एक तास संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वायरमन व महावितरणच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित वायरमन कधीच वेळेत फोन उचलत नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
मदतीचे आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात
मृत व्यक्तीच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ग्रामस्थांनी मदतीची मागणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांमधून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दर्शविली.